प्रतिनिधी: संतोष यादव

 

पुणे,येरवड्यातील गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेलचालकाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकी राजू चंडालिया(वय 28, रा. जय जवान नगर येरवडा ) याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विकी याच्यावर सराईत गुन्हेगार आकाश चंडालिया व त्याच्या साथीदारांनी पैशांच्या मागणीवरून गोळीबार केला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. सुरुवातीला त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करून एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी देखील आणखी एक शस्त्रक्रिया त्याच्यावर करण्यात आली.

दरम्यान रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना विकी याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेत येरवडा पोलिसांनी पूर्वीच पाच आरोपींना अटक केलेली आहे. मुख्य आरोपी आकाश हा देखील जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान येरवड्यातील हॉटेल चालकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली होती. येरवडा व परिसरात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून अशाप्रकारे दहशत निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातूनच गोळीबारासारखी ही गंभीर घटना घडली. दुर्दैवाने जखमी हॉटेल चालकाचा उपचारादरम्यान या घटनेत मृत्यू झाला. विकी याच्या पश्चात आई-वडील व लहान बहिण भाऊ असा परिवार आहे. विकीच्या मृत्यूनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयात तसेच त्याच्या घराजवळ बंदोबस्त नेमला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!