संपादक शहानवाज मुलाणी

पुणे ,महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (दि.२९) सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांचीही सभा येत्या शुक्रवारी होणार आहे.

आरटीओ ऑफिस शेजारी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) मैदानावर दि. ३ मे या दिवशी सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, भारतीय रक्षक आघाडीचे प्रमुख टेक्सास गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी यांची विदर्भात सभा झाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दि. ७ मे या दिवशी होणार आहे. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या दि. १३ मे या दिवशी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी यांची सभा होणार आहे. सभेसाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ४० हजार जणांची सभेला उपस्थिती राहणार असल्याचा दावा काॅंग्रेसकडून करण्यात आला आहे. या सभेला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

देश अडचणीत सापडलेला आहे. भाजपने संविधान बदलण्याचा घाट घातलेला आहे. त्यामुळे देशातील लोकशाही, संविधान टिकविण्यासाठी जनजागृतीची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी आयपीआय (आठवले गट), वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष यांनी पक्ष बाजुला ठेवून चळवळीत सहभाग घेतला पाहिजे, असे टेक्सास गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!