प्रतिनिधी :संतोष यादव

 

पुणे :पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पोलिसांनी मंगळवारी चौघांना बेड्या ठोकल्या. बांधकाम व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली.

त्याबरोबरच ‘कोझी’ हॉटेलचा मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ‘ब्लॅक’चा मालक संदीप रमेश सांगळे यांनाही अटक करण्यात आली आहे.

 

हॉटेलमालकासह व्यवस्थापकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली असून बांधकाम व्यावसायिकाला आज, बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. कल्याणीनगर भागात रविवारी मद्याधुंद अवस्थेतील अल्पवयीन चालकाने मोटरसायकलला धडक देऊन संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा बळी घेतला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुलाचे वडील तसेच त्याला मद्या देणाऱ्या हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर बांधकाम व्यावसायिक असलेले मुलाचे वडील पुण्यातून पसार झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर परिसरातील एका हॉटेलमधून बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या चालकाला ताब्यात घेतले.

मुलाविरूद्ध स्वतंत्र गुन्हा.

कल्याणीनगर अपघात गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला. मुलाला मद्याविक्री प्रकरणी हॉटेलमालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटना वेगळ्या आहेत, स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. मुळात हे प्रकरण गंभीर आहे. अपघातात दोघांचा बळी गेला आहे. पब, हॉटेलमध्ये खातरजमा न करता मुलांना मद्या विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. पब, हॉटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या गोंधळाच्या तक्रारी आल्या आहेत. मद्या पिऊन वाहन भरधाव चालविल्याने निष्पापांचा बळी गेला, अशा शब्दांत अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी सुनावले.

वडिलांनीच मोटार दिली…

कल्याणीनगर भागात अपघात प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाची चौकशी करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा मी मद्याप्राशन करतो, याची माहिती वडिलांना होती. वडिलांनी मला मोटार दिल्याची कबुली त्याने न्यायालयात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बालन्याय मंडळाच्या निकालावर फडणवीसांची नाराजी

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचे पडसाद उमटू लागल्यावर राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीने पुण्यात येऊन पोलिसांकडून आढावा घेतला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने केल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी तपास अहवाल सादर केल्यानंतरही आरोपी मुलाला जामीन देण्याचा बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पबमध्ये होणारे गैरप्रकार लक्षात घेता यापुढे परवानगी देण्याचे धोरण बदलले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

गरीबश्रीमंतांना एकच न्याय हवा राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आरोपी मुलाला जामीन देण्याच्या बाल न्याय मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बांधकाम व्यावसायिकाचा पुत्र असल्यानेच अशी वागणूक मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. हेच जर ट्रक किंवा टॅक्सीचालक असते तर, त्यांना कारागृहात खितपत पडावे लागले असते असे राहुल यांनी चित्रवाणी संदेशात म्हटले आहे. या मुद्द्यावर त्यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी हे देशात दोन भारत निर्माण करू पाहात आहेत, असा आरोप गांधी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!