प्रतिनिधी,

पुणे: कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था (एनपीपीओ), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन अपेडाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर अमेरिकेला डाळिंब निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्रीमती सुधांशू यांनी यावेळी व्यक्त केला.

 

कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे डॉ. आर. ए. मराठे, अपेडाचे सरव्यवस्थापक यु. के. वत्स, प्लॅंट प्रोटेक्शन ॲडवायजर जे. पी. सिंग, विकिरण सुविधा केंद्राचे प्रमुख सतिश वाघमोडे आदिंसह अधिकारी व निर्यातदार उपस्थित होते.

 

डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिका देशाने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास २०१७-१८ मध्ये बंदी घातली होती. अपेडा व एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी वारंवार चर्चा केली असता मानकांच्या आधारे २०२२ मध्ये निर्यात बंदी उठविण्यात आली.

 

डाळिंब फळाविषयी निश्चित केलेल्या मानकानुसारच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी, नवी मुंबई येथील सुविधा केंद्रावरुन डाळिंबाचे १५० खोके (४५० किलो) अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे हवाईमार्गे पाठविण्यात आल्याची माहिती उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!