प्रतिनिधी,

पुणे,  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि थेट कर्ज योजनेचे पुणे जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी महामंडळाशी संपर्क साधावा.

*२५ टक्के बीज भांडवल योजना:* ही योजना राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून राबविण्यात येते. योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. बँकांचा सहभाग ७५ टक्के असून व्याजदर बँकाच्या नियमाप्रमाणे लागू राहील. महामंडळाचा सहभाग २५ टक्के रकमेवर व्याजदर ४ टक्के आहे. या योजनेत महत्तम प्रकल्प मर्यादा ५ लाख रुपयेपर्यंतची आहे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे.

*वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:* या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत महत्त्म कर्ज मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. कर्जरकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

*गट कर्ज व्याज परतावा योजना:* या योजनेकरिता कर्जाची मर्यादा १० लाख ते ५० लाख रुपयापर्यंत असून या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत. गटातील सदस्याचे वय १८ ते ४५ वर्ष पर्यंत असावे. गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील प्रमुख सदस्याने महामंडळाच्या महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. गटातील सर्व लाभार्त्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरकरिता असलेल्या कौटुंबिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत असावे.

*१ लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज योजना:* या योजनेमध्ये महामंडळाकडून १ लाख रूपयाचे थेट कर्ज दिले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे. लाभार्थ्यांचा सहभाग निरंक राहील. नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल २ हजार ८५ रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यांवर दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ‘बी’ विंग, तळमजला, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, येरवडा पुणे, दूरध्वनी क्रमांक ०२०- २९७०३०४९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!