प्रतिनिधी,

 

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मिशन मोड वर पर्यटन विकसित’ करण्याच्या दूरदृष्टीला अनुसरून पर्यटन मंत्रालयाने भारताला जागतिक पटलावर प्रमुख विवाहस्थळ म्हणून प्रदर्शित करण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा केला शुभरंभ*

भारताला जगात विवाहसाठीचे पसंतीचे स्थळ म्हणून प्रस्थापित करण्याच्या विशेष मोहिमेचा शुभारंभ करतांना, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की “आज एका महत्वाच्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. असे एक मिशन, जे भारताला जगभरातील सर्वोत्कृष्ट विवाह स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यास मदत करणारे आहे. या अभियानाच्या शुभारंभासह, मी देशभरातील विवाहोत्सुक जोडप्यांना इथे येण्याचे आणि आमच्या ह्या अद्भुत देशात त्यांच्या स्वप्नातील विवाह स्थळ ( वेडिंग डेस्टीनेशन्स) शोधण्याचे आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे आमंत्रण देतो आहे.” ह्या मोहिमेमागचा विचार अधोरेखित करत त्यांनी पुढे सांगितले, “ आमच्या सर्वंकष दृष्टिकोनाद्वारे प्रत्येक क्षण म्हणजे पहिल्या हॅलो पासून ते शेवटच्या ‘मी तयार आहे’ पर्यंतच्या क्षणापर्यंत तुम्हाला भारताच्या प्रेमळ आतिथ्यशीलतेची आणि समृद्ध परंपरेची अनुभूती मिळेल,असा शब्द आम्ही देतो.”

 

या मोहिमेची सुरुवात, देशभरातील 25 महत्वाच्या विवाह स्थळांची माहिती देणारे प्रोफाईल तयार करण्यापासून झाली. यात विवाहोत्सुक जोडप्यांसाठी भारत कशा प्रकारे पसंतीचे स्थळ ठरू शकेल, याचे वर्णन करण्यात आले आहे. यात, भुरळ पाडणारी आकर्षण स्थळे ते पवित्र परंपरा, कल्पनातीत आनंदासह, अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उपलब्धता, भारताच्या प्राचीन वारशाची आधुनिक अभिजाततेशी घातलेली सांगड, जोडप्यांना विवाह संस्कारात बांधले जाण्यासाठी आमंत्रित करणारी आहे, भारताच्या भव्यतेचे दर्शन घडवणारी आहे. ही विवाहस्थळे प्रेम आणि उत्सवाच्या या अविस्मरणीय प्रवासाची सुंदर सुरुवात करण्यासाठी जगाला निश्चित भुरळ पाडतील.

 

सहकार्यात्मक दृष्टिकोन हे या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यात उद्योग तज्ञ, विवाह विषयक संघटना आणि अनुभवी विवाह मंडळे या सर्व घटकांशी सल्लामसलत करून ही स्थळे विकसित करण्यात आली आहेत. त्यांच्या अमूल्य सल्ल्यांमुळे ह्या मोहिमेची एक सर्वसमावेशक संकल्पना विकसित करण्यात आली ज्यातून, विवाह पर्यटन स्थळ म्हणून भारतातील आकर्षण स्थळे उलगडून दाखवण्यात आली आहे. यात, विविध आकांक्षांचा विचार करण्यात आला आहे, त्याचवेळी, ह्या अद्भुत देशाचे असंख्य पैलूही अधोरेखित करण्यात आले आहेत.

 

इव्हेंट अँड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट असोसिएशन- EEMAचे अध्यक्ष समित गर्ग या मोहिमेविषयी म्हणाले, “ही कल्पना प्रत्यक्षात येताना पाहणे खरोखरच स्वप्नवत आहे, विशेष म्हणजे ही कल्पना लोकांना आवडत असल्याचे दिसते आहे. पंतप्रधानांच्या या दृष्टिकोनाचे कृतीत रुपांतरित केल्याबद्दल आणि वेडिंग टुरिझम मोहिम अस्तित्वात आणल्याबद्दल पर्यटन मंत्रालयाचे मनःपूर्वक कौतुक.”

 

भारतातील विवाह व्यवस्था उद्योग आणि एकूणच पर्यटनाच्या वाढीला चालना देतानाच, लग्नाचा अविस्मरणीय अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी भारताला अग्रगण्य पर्याय अशी ओळख मिळवून देणे, हे अतुल्य भारताच्या ह्या विवाह स्थळ मोहिमेचे उद्दिष्ट आहे. भारताच्या परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या पार्श्वभूमीवर, ह्या जोडप्यांसाठी विवाहाच्या अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा आणि प्रेमाच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करण्याचा मंत्रालयाचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!