प्रतिनिधी.

पुणे, दि. २४: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) संघ लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उतीर्ण झालेल्या ३१४ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक साहाय्य वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

 

संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला असून महाज्योतीमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून एकरकमी ५० हजार रुपये अर्थसहाय्याकरिता १६ जून ते ८ जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात आले  होते. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ३५६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३१४ विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी २९८ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण १ कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येईल.

 

संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा १५  सप्टेंबर रोजी होणार असून संबंधित विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या अर्थसहाय्याचा या परीक्षेच्या तयारीसाठी लाभ होणार आहे, अशी माहितीही महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!