प्रतिनिधी,

सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीला आणला असून यात 7.66 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) इनपुट टॅक्स क्रेडिटचा समावेश आहे. याप्रकरणी मे. श्री बालाजी गोल्डच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

प्रधान मुख्य आयुक्त, सीजीएसटी मुंबई क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय गुप्तवार्ता एकाकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या करचुकवेगिरी-विरोधी शाखेने तपास सुरू केला होता. केंद्रीय गुप्तवार्ता एककाकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या आणि इतर माहितीच्या आधारे, मालाचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पावत्या जारी करून बनावट आयटीसी मिळवणे आणि मंजूर करणे, या संदर्भात मे. श्री बालाजी गोल्ड विरोधात तपास सुरू करण्यात आला.

फर्मच्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणाहून कोणतेही कायदेशीर व्यवसाय करण्यात आले नसल्याचे, मेसर्स श्री बालाजी गोल्डच्या नोंदणीकृत परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत आढळून आले.

फर्मचा मालक 19.10.2023 रोजी तपासात सामील झाला. त्याची साक्ष नोंदवण्यात आली. त्यामध्ये त्याने या कर फसवणुकीत आपला हात असल्याचे कबूल केले. या फर्मने मालाचा पुरवठा न करता 7.66 कोटी रुपयांच्या आयटीसीसह 263 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांवर फसवून इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन करून, प्रत्यक्षात माल प्राप्त न करता फसव्या पद्धतीने, अस्वीकार्य इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठीच्या बोगस पावत्या प्राप्त करण्यात आल्या होत्या.

तपासादरम्यान मिळालेले प्रत्यक्ष पुरावे आणि या करफसवणुकीत सहभागी असल्याची आरोपीची कबुली या आधारे आरोपीला, सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 20.10.2023 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत. हे प्रकरण सीजीएसटी मुंबई क्षेत्राने करचुकवेगिरी करणारे आणि बनावट आयटीसी नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम सीजीएसटी अधिकारी येत्या काही दिवसात अधिक जोरदारपणे राबवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!