संपादक: शहानवाज मुलाणी

मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत गेल्या महिनाभरात बंद कारखान्यांतून शेकडो कोटी रूपये किंमतीचे मेफेड्रोन (एमडी) हस्तगत करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर घुगे यांची बदली झाल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अचानकपणे आदेश काढून मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे यांची बदली नियंत्रण कक्षात केली.

याशिवाय पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांचीही बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. मोहोळजवळील चिंचोळी एमआयडीसीमध्ये बंद रसायन कारखान्यांमध्ये उत्पादित होणारे मेफेड्रोन (एमडी) आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल गेल्या महिन्यात प्रथम मुंबई पोलिसांनी छापा टाकून हस्तगत केला होता. त्यापाठोपाठ नाशिक पोलिसांनीही मोहोळच्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत बंद कारखान्यावर धाड टाकून मेफेड्रोनसह कच्च्या मालाचा साठा जप्त केला होता.

दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलिसांनीही याच परिसरात छापेमारी करून मेफेड्रोनसह कच्चा माल जप्त केला होता. मेफेड्रोन निर्मिती आणि विक्री व्यवस्थेत मुंबई आणि नाशिकशी सोलापूर जोडले गेल्याचे आढळून आल्यामुळे संपूर्ण राज्यात सोलापूरचे नाव चर्चेत राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस ठाण्यातून घुगे यांना नियंत्रण कक्षात आणण्यात आल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी त्याबद्दल तर्कवितर्क केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!