संपादक: शहानवाज मुलाणी

दिल्ली, मुंबईपाठोपाठ मोठ्या शहरांमध्ये हवेची प्रदूषण पातळी धोकादायक स्तरावर पोहोचल्याने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वच महापालिकांना प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार पुणे महापालिकेने हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषणाबाबत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले; तसेच संबंधित सर्वच अधिकाऱ्यांना या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती रोज आयुक्त कार्यालयाला देण्यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश दिले. दिल्लीतील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.

प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागल्याने शाळांना सुटी देण्यात आली असून, अन्य उपाययोजनाही करण्यात येत आहेत. मोठ्या शहरांमधील प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत असून, दिवाळीनिमित्त होणाऱ्या आतषबाजीने त्यात भर पडणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले असून, थंडीही कमी आहे. दिवसा रात्री उकाडा आणि पहाटे थंडी आणि त्याला प्रदूषणाची जोड यामुळे श्वसनाचे विकास वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार, राज्य प्रदूषण नियामक मंडळाने सर्वच महापालिकांना हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी गाइडलाइन्स दिल्या आहेत. त्याचा आधार घेऊन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी नियमावली केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वच महापालिकांची ऑनलाइन मीटिंग घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजनांसंदर्भात सूचना केल्या.

 

प्रामुख्याने बांधकाम आणि खोदाईमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे हवा प्रदूषित होत आहे. पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बांधकामांच्या ठिकाणी आवश्यक काळजी घेण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात आले. परवानगी देतानाच्या नियमांनुसार कामाच्या ठिकाणी नियोजन केले जात नसल्यास कारवाई करावी, असे आदेशात नमूद केले आहे. बांधकाम विभागाकडील अभियंते आणि क्षेत्रीय कार्यालयावरील सहायक आयुक्त कार्यालयांनी त्यांच्या क्षेत्रात हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती रोजच्या रोज गुगलशीटवर टाकण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखालील उपअभियंता, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि सहायक निरीक्षकांचा समावेश असलेली हवा प्रदूषण नियंत्रण पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवा प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण मंडळ, जनसंपर्क विभाग आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाने संयुक्तपणे व्यापक उपक्रम हाती घ्यावेत. यासोबतच प्रदूषणाबाबतची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर अपलोड करणे बंधनकारक राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रमुख सूचना :

१) ,बांधकामाच्या ठिकाणी चोहोबाजूने किमान 25 फूट उंचीचे पत्रे लावले आहेत, याची खातरजमा करावी.

२) बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या भोवती हिरव्या रंगाचे कापड लावले आहे का, याची तपासणी करावी.

३) इमारत अथवा बांधकाम पाडताना भोवती हिरव्या ओल्या कापडाचे आच्छादन लावणे बंधनकारक आहे.

४) बांधकामाच्या ठिकाणचे साहित्य लोडिंग करताना पाण्याची फवारणी करावी.

राडारोडा, क्रशसँड, सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनातून माल रस्त्यावर पडणार नाही, यासाठी आच्छादन टाकावे.

५) राडारोडा महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणीच टाकावा. रात्रीच्यावेळी उघड्यावर राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रशासनाने पथके नेमावीत.

६) बेकरींमध्ये लाकडी भट्ट्यांचे रूपांतर इलेक्ट्रीक अथवा पीएनजी गॅसवर करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

हवा प्रदूषणाबाबत सातत्याने जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!