संपादक: शहानवाज मुलाणी

पुणेकरांना आता आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. डेंगू, मलेरियापेक्षाही घातक असलेला झिकाचा रुग्ण पुण्यात आढळला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आल्या आहेत.

पुण्यातील येरवडा परिसरात एका ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेला झिकाचे निदान झाले आहे. याची गंभीर दखल आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी घेत संपूर्ण जिल्हाधिकारी यांना झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

पुण्यात येरवडा येथे झिका बाधित महिलेला ५ नोव्हेंबर रोजी ताप आला होता. यावेळी तिच्या रक्ताचे नमुने हे १० नोव्हेम्बरला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही) ला पाठवण्यात आले. ११ नोव्हेंबर रोजी तिचा तपासणी अहवाल हा झिका पॉझिटीव्ह आला. ही महिला १५ ऑक्टोबरला केरळ ला गेली होती. त्या ठिकाणी तिला झिकाची बाधा झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुधवारी (दि १५) साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रताप सिंह सारणीकर यांनी येरवडा येथे बाधित रुग्ण आढळलेल्या प्रतिक नगर येथे जात रुग्णाची भेट घेतली. तसेच तब्येतीची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. या सोबतच पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

येरवडा येथे आढळलेली झिका बाधित महिलेला ५ नोव्हेंबर रोजी ताप आल्याने तिची झिका चाचणी करण्यात आली होती. तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला. झिका बाधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील ५ जणांचे रक्तनमुने हे तपासणीसाठी घेतले आहे असून त्यांना या आजाराची कोणतेही लक्षणे नाही अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.

सारणीकर म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत झिकाचे १० रुग्ण आढळले आहे. त्यांना गंभीर आजार नव्हता. झिकाचा धोका हा गर्भवती महिलांना जास्त असतो. दरम्यान, तपासणी पथकाने संबंधित महिलेच्या घराची तपासणी केली असता, महिलेच्या घरातील फ्लॉवरपॉटमध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. अळ्या आणि अंड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत, असे राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ महेंद्र जगताप यांनी सांगितले.

झिका विषाणू प्रामुख्याने संक्रमित एडीस प्रजातीच्या डासांच्या चावण्याने होतो. जरी झिका विषाणू रोग सामान्यतः सौम्य आहे. जर रुग्णाची प्रकृती ही गंभीर होण्याआधी त्याला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!