संपादक: शहानवाज मुलाणी

नाशिक : नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या शुक्रवारी (ता.२४) पदभार स्वीकारला. गेल्या दहा वर्षांतील कर्णिक हे आठवे पोलीस आयुक्त असून, यापूर्वीच्या आयुक्तांनीही शहरात विविधांगांनी उपक्रम राबवून आपआपली छाप सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु यातील बहुतांशी उपक्रम हे ‘नवा गडी नवा डाव’ असाच अनुभव नाशिककरांनी घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांची बदली झाली की उपक्रम चांगला असला तरी त्याचा गाशा गुंडाळला जातो आणि नवीन आयुक्तांचे नवे उपक्रम सुरू होतात, असेच दिसून आलेले आहे. दरम्यान, नवीन आयुक्त कर्णिक सध्या तरी ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत दिसून येत आहेत.

गेल्या दहा वर्षांत (२०१२ पासून) नाशिक शहर आयुक्तालयाला सात पोलीस आयुक्त लाभले असून, संदीप कर्णिक आठवे आयुक्त आहेत. या दहा वर्षांमध्ये कुलवंत कुमार सारंगल आणि डॉ. रवींद्र कुमार सिंगल वगळता उर्वरित पाच पोलीस आयुक्तांना आपला दोन वर्षांचा कार्यकालही पूर्ण करता आलेला नाही. यात एस. जगन्नाथन्‌, विश्वास नांगरे-पाटील, दीपक पाण्डेय, जयंत नाईकनवरे, अंकुश शिंदे यांचा समावेश होतो. त्यातही अवघ्या ९ महिन्यांचा अल्पावधी काळ जयंत नाईकनवरे यांचा राहिला.असे असले तरी गेल्या दहा वर्षांमध्ये शहराला लाभलेल्या या पोलीस आयुक्तांनी आपआपल्या कामाची छाप सोडली आहे. गुन्हेगारी आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविले. त्यात प्रामुख्याने गुन्हेगारीविरोधात थेट रस्त्यावर उतरून कारवाई करणारे कुलवंत कुमार सारंगल नाशिककरांच्या लक्षात राहिलेत तर, वाहतुकीसंदर्भात जनजागृतीच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. रवींद्र कुमार सिंगल आजही स्मरणात आहेत. दीपक पाण्डेय यांनी हेल्मेट सक्तीसाठी थेट पेट्रोल पंप मालक-चालकांनाच अंगावर घेतले. त्यातून वादंगही झाला. एस. जगन्नाथ हे मैत्रेय फसवणुकीच्या प्रकरणात गुंतवणूकदारांना लाभ मिळवून देण्याच्या वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिले होते. त्याशिवाय त्यांच्याच काळात शहरात पोलिसांकडून मॅरेथॉनही सुरू केली. नंतर कोरोनापासून ती खंडित झाली. विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस चौक्यांचा उपक्रम राबविला. तर, नाईकनवरे यांनी सप्तरंगी रस्त्यांचा प्रकल्प हाती गेला, जो पूर्णत्वास गेलाच नाही. अंकुश शिंदे यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी कडक धोरण स्वीकारल्याने अनेक ‘राजकीय’ नेत्यांच्या पंटरांना कारागृहात धाडले. तसेच, पोलीस ठाण्यात येणार्या प्रत्येक तक्रारीचा गुन्हा दाखल करण्यावर त्यांचा भर राहिला होता.

कर्णिकांकडून आढावानवनियुक्त आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यानंतर त्याच दिवशी पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, प्रभारी पोलीस अधिकारी आणि विविध शाखांच्या प्रमुखांची ‘मॅरेथॉन’ बैठक घेतली.यावेळी त्यांनी शहरातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना करतानाच बैंठकीत त्यांनी निरीक्षणाची भूमिका घेतली.शहरातील वाहतुकीच्या समस्यांसह गुन्हेगारी, आर्थिक फसवणूक या सारख्या गुन्ह्यांसह पोलिस दलातील राजकीय हस्तक्षेपाचाही ते बारकाईने आढावा घेत आहेत. त्यामुळे एकूणच सध्यातरी ते ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असून, लवकरच ते ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसतील.दहा वर्षांतील आयुक्तांची प्रमुख उपक्रम/कामगिरी१. कुलवंत सारंगल : गुन्हेगारांविरोधात कडक धोरण२. एस. जगन्नाथन्‌ : ‘मैत्रेय’ फसवणुकीचा गुन्हा; गुंतवणूकदारांना लाभ३. डॉ. रवींद्र सिंगल : हेल्मेट सक्तीसह वाहतूकीसंदर्भात उपक्रमांवर भर४. विश्वास नांगरे-पाटील : पोलीस चौक्यांची निर्मिती५. दीपक पाण्डेय : ‘हेल्मेट असेल तरच पेट्रोल पंपावर पेट्रोल’चा उपक्रम६. जयंत नाईकनवरे : ‘सप्तरंग रोड मॅप’चा उपक्रम७. अंकुश शिंदे : गुन्हेगारीविरोधात पथके; सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!