संपादक: शहानवाज मुलाणी

परभणी : पेट्रोलिंग करत असतांना पहाटे पकडलेल्या 2 आरोपींना सकाळी 11 ऐवजी 11 वाजून 45 मिनिटांनी म्हणजे पाऊण तास उशीर झाल्याने, न्यायदंडाधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा सुनावलीय. या घटनेने पोलिसांत मात्र निराशेचे वातावरण निर्माण झाले असुन, न्यायदंडाधिकारी यांनी सुनावलेल्या शिक्षेविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच पालक न्यायाधीश यांच्याकडे तक्रार करत दाद मागितली आहे. परभणी जिल्ह्यातील ही घटना आहे.

अधिक माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी मानवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे शहरात रात्रीच्या गस्तीवर होते. दरम्यान, पहाटे 3 वाजुन 45 मिनिटांनी चोरीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे फिरणारे दोनजण पोलिसांना दिसून आले. त्यामुळे कलम 122 अंतर्गत या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्या दिवशी रविवार असल्याने या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याबाबत मानवत येथील न्यायदंडाधिकारी यांनी 11 वाजता घेऊन येण्याबाबत कळवले होते. मात्र, काही कारणावरून सदर पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष दोन्ही आरोपींना हजर करण्यास उशीर झाला. तर,11 ऐवजी 11.45 मिनटांनी हे पोलीस कर्मचारी न्यायालयात पोहचले.

आरोपींना न्यायालयासमोर आणले असल्याबाबत न्यायदंडाधिकारी यांना कळवण्यात आले. तेंव्हा न्यायदंडाधिकारी न्यायालयात आले. त्यांच्यासमोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना हजर केले. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना, न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना मी तुम्हाला आरोपींना 11 वाजता हजर करण्यासाठी सांगितले होते असे सांगितले. मात्र, तुम्ही 11 वाजून 45 मिनिटाला आरोपींना हजर का केले असा प्रश्न विचारला. सोबतच, उशीर झाल्याबद्दल पोलिसांना गवत काढण्याची शिक्षा सुनावली.

न्यायदंडाधिकारी यांनी पोलीस कर्मचारी यांना गवत काढण्याची शिक्षा सुनावल्याने, याबाबत संबधित पोलीस कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. तर, संबधित पोलीस कर्मचारी यांची बाजू न ऐकता, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना ड्रेसवर गवत कापायला लावणे बेकायदेशीर असल्याचे पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी म्हटले आहे. तसेच, याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि पालक न्यायाधीक्षांकडे सदर न्यायदंडाधिकारी यांची पोलीस अधीक्षक यांनी तक्रार देखील केली आहे.

चुकीच वाटल्यास पोलीस प्रशासनाकडे तक्रार किंवा अहवाल देता आला असता…

आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी 24 तासांची मुदत असते. त्याच मुदतीत या आरोपींना आमच्या कर्मचाऱ्यांनी न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले होते. नियमानुसारच पोलिसांनी काम केले. मात्र, न्यायदंडाधिकारी यांना जर काही चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार किंवा त्याचा अहवाल दिला असता तर ते नियमात झाले असते. परंतु, पोलिसांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांना ड्रेसवर अशा प्रकारे गवत कापण्याची सुनावलेली शिक्षा चुकीची आहे. त्यामुळे, आम्ही याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच आमचे पालक न्यायाधीश यांच्याकडे तक्रार करून दाद मागितली असल्याचे पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!