संपादक: शहानवाज मुलाणी

नागपूर: तब्बल चार महिन्यांपासून पोलिस स्टेशनच्या ताब्यात असलेला रेती भरलेला टिप्पर सुपूर्तनाम्यावर सोडण्याबाबत टिप्पर मालक आणि पोलिस कर्मचाऱ्यातील फोनवरील संवाद पोलिस अधीक्षकांच्या दालनात पोहचताच, सदर पोलिस कर्मचाऱ्याला गुरुवारी (दि. ३०) निलंबित करण्यात आले. संवादाच्या तब्बल १७ ऑडिओ क्लिप असून, यात पैशाची देवाणघेवाण, न्यायालयाचा अपमान आणि टिप्पर पळविण्याबाबत संभाषण आहे

रसपाल बडगे असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो भिवापूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस नाईक पदावर कार्यरत आहे. परिवीक्षाधीन पोलिस उपअधीक्षक राहुल झाल्टे यांनी भिवापूरच्या ठाणेदार पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर ताब्यात घेतले होते. यातीलच एक टिप्पर मागील चार महिन्यांपासून पोलिस स्टेशनच्या ताब्यात आहे. दरम्यान, टिप्परमालकाने न्यायालयातून सुपूर्तनामा आणल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याने पोलिस स्टेशन गाठले.

दरम्यान, कागदोपत्री कार्यवाही पश्चात टिप्पर सोडल्या जात नसल्याबाबत टिप्पर मालक आणि सदर पोलिस कर्मचारी यांच्यात फोनवर संवाद झाला. यादरम्यान त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे कॉल रेकॉर्डिंगमध्ये दिसते. सुपूर्तनामा असूनही महसूल विभागाच्या एका पत्रामुळे पोलिस विभाग सदर टिप्पर सोडत नसल्याने संतापलेला टिप्परमालक आणि सदर पोलिस कर्मचारी फोनवर मुक्त संवाद करत आहे. अशा एकूण १७ ऑडिओ क्लिप पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील एक क्लिप अन्य एका कर्मचाऱ्याची असल्याचे कळते. त्यावर तत्काळ कारवाई करीत, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रसपाल बडगे यास निलंबित केले.

मुख्य कलाकार कोण?या संपूर्ण प्रकरणाच्या एकूण ४१ ऑडिओ क्लिप असल्याचे कळते. यातील मोजक्या १७ क्लिपच समोर आल्याचेही बोलले जाते. निलंबित पोलिस कर्मचारी मोकळ्या मनाचा व बोलक्या स्वभावाचा आहे. याचा परिचय ‘त्या’ क्लिपमधून होतो. त्यामुळे देवाणघेवाणीचा विषय कुणाच्या सांगण्यावरून झाला. पडद्यामागचा मुख्य कलाकार कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे.

मी भिवापूर पोलिस स्टेशनच्या ठाणेदार पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीची ही घटना आहे. टिप्पर मालक आणि सदर पोलिस कर्मचारी यांच्यातील संवादाच्या ऑडिओ क्लिपवरून झालेली ही कारवाई आहे.- प्रमोद चौधरी, ठाणेदार, भिवापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!