संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे:दंड वसुलीच्या नावाखाली दुकानदाराच्या माध्यमातून वाहनचालकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक पोलिस कर्मचारी संग्राम लक्ष्मण पवार याला तातडीने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केली.

संग्राम पवार कोथरूड वाहतूक विभागातील नळस्टॉप चौकात चार डिसेंबर रोजी नेमणुकीस होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पवार याने एका दुचाकीस्वार महिलेला थांबवून दुचाकीची एनओसी मागितली. त्यानंतर दहा हजार रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. महिलेने दंड भरण्यास असमर्थता दाखविल्यानंतर पवार याने एक हजार रुपये रोख देण्याची मागणी केली. दुचाकीस्वार महिलेने दंडाची रक्कम काहीतरी कमी करा, अशी विनंती केली. त्यानंतर पवार यांनी पाचशे रुपये मागितले. पैसे देण्यासाठी महिलेने ऑनलाइन पेमेंटसाठी मोबाईल नंबर मागितला. पण, पवार याने ऑनलाइन दंड भरणार असाल तर १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावेळी महिलेने पुन्हा काहीतरी मदत करा, अशी विनंती केली. तेव्हा पवार याने न्यू इंदप्रस्थ मिनीमार्केटमधील एका दुकानात क्यूआर कोड स्कॅन करून पाचशे रुपये रोख आणून देण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने त्या दुकानदाराकडे ५२० रुपये ऑनलाइन पेमेंट करून पाचशे रुपये घेऊन पवार यांना दिले. चार डिसेंबर रोजी घडलेली जुनी घटना प्रसारमाध्यमामुळे ११ डिसेंबरला उघडकीस आली. पोलिस उपायुक्त मगर यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी संग्राम पवार याला निलंबित केले.

मागील वर्षभरात बेशिस्त वर्तन आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील आठ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

तसेच, २५ पोलिस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली असून, ४७ कर्मचाऱ्यांच्या नियंत्रण कक्ष आणि इतरत्र बदल्या करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांकडील इ-चलन मशिनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून दंड भरण्याची सुविधा आहे. त्यामुळे वाहनचालकांनी दुकानदार किंवा अन्य ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करून दंड भरू नये.

वाहतूक पोलिसांकडील इ- चलन मशिनद्वारेच दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!