संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे- येरवड्यात सशस्त्र हत्यारांची दहशत करीत तब्बल वीस पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना येरवडा पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. अविनाश शिंदे उर्फ सुक्या (वय 20, रा. जय जवान नगर येरवडा) व मंगेश काळोखे उर्फ घुल्या (वय 19, रा. निळा झेंडा चौक,लक्ष्मी नगर येरवडा) या दोघांना अटक करण्यात आली असून या गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी शुक्रवारी रात्री त्यांची येरवडा परिसरात “धिंड” काढण्यात आली. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची वाहने विनाकारण तोडफोड करून नुकसान करणाऱ्या आरोपींना अद्दल घडवल्याबद्दल नागरिकांनी येरवडा पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. 26 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लक्ष्मी नगर व परिसरातील 20 पेक्षा अधिक वाहनांची जुनेद शेख, अविनाश शिंदे, मंगेश काळोखे, निखिल शिंदे व त्याच्या साथीदाराने सशस्त्र हत्याराने तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. वाहनांच्या तोडफोडीचा गुन्हा करून आरोपी फरार झाले होते.या मधील दोघा आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी वाहनांची तोडफोड केलेल्या घटनास्थळावर घेऊन जाऊन लक्ष्मी नगर व संपूर्ण परिसरातून त्यांची “धिंड”काढण्यात आली. येरवडा लक्ष्मी नगर व परिसरात सराईत गुन्हेगारांकडून वाहनांची

तोडफोड तसेच सशस्त्र हत्यारांचा वापर करून परिसरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांची परिसरातून “धिंड”काढण्यात आली. येरवडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. सराईत गुन्हेगारांसह अल्पवयीन व्यसनाधीन बालकांकडून परिसरात वारंवार गुन्हे घडण्याचे प्रकार घडत आहेत. लक्ष्मी नगर परिसरात रात्री अप रात्री सराईत गुन्हेगारांची टोळकी चौकात चौकात तसेच गल्ल्यामध्ये उभी असतात. दुचाकी वरून बेफामपणे हॉर्न वाजवत इतर वाहनांना कट मारून जाणे, टोळक्याने थांबून परिसरात रिक्षा व वाहनांचे आवाज मोठे करून गाणी वाजवणे, रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पान टपरी, खाद्य पदार्थांच्या हातगाड्या यांच्यावर गर्दी करणे, तसेच सशस्त्र हत्यारांची दहशत निर्माण करणे असे गंभीर प्रकार सातत्याने घडत असतात. या संपूर्ण परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक श्रीमती कांचन जाधव, गुन्हे निरीक्षक जयदीप गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे यांच्यासह पोलिस अंमलदार यांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!