संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे : पुणे शहरातील सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याचा त्याच्याच साथीदाराने शुक्रवारी दुपारी गोळया झाडून खून केला. मोहोळ वर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यातील तीन गोळ्या त्याला लागल्या. तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले मात्र, त्याचा उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित

केले. मोहोळसोबत झालेल्या वादामधून हल्लेखोर तरुणाच्या थोबाडीत मारण्यात आली होती.त्याचा राग आणि जमिनीचा असलेला वाद यातून मोहोळचा गेम करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शरद मोहोळ याच्या खून प्रकरणी अरुण धुमाळ (रा. कोथरूड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर (वय ३२, रा. सुतारदरा, कोथरूड) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मोहोळच्या हत्येच्या तपासासाठी गुन्हे शाखेची नऊ पथके पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली होती. दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान एका संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून ८ आरोपी, ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ राउंड व इतर आणखी दोन कार ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या व पैशाच्या जुन्या वादातुन आरोपीनी केला असल्याचे प्रथम दर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आलेले आहे. याप्रकरणी परीमंडल तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार(दि.5 जाने) शरद मोहोळ यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो सुतारदरा येथील घरापासून थोड्या अंतरावर आला. त्यावेळी त्याच्यासोबत अरुण धुमाळ, आरोपी मुन्ना पोळेकर, त्याचे इतर दोन साथीदार होते. मुन्ना पोळेकर याचे काही दिवसांपूर्वी मोहोळच्या गाडी चालकासोबत वाद झाले होते. त्यावेळी मोहोळचा त्याच्याशी वाद घातला होता. तसेच मोहोळ आणि पोळेकर यांच्यामध्ये एका जमिनीवरून देखील वाद सुरू होते. या वादातून मोहोळने पोळेकरच्या थोबाडीत लगावली होती. या मारहाणीचा राग पोळेकरच्या मनात सलत होता.शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ, धुमाळ आणि पोळेकर सोबत चाललेले होते. त्यावेळी पोळेकर याने आपल्या सोबत आणखी दोन साथीदार आणलेले होते. घराकडे चालत जात असलेल्या मोहोळच्या पाठीमागे जाऊन पिस्तूलामधून आरोपीने चार गोळ्या झाडल्या.यातील तीन गोळ्या मोहोळच्या शरीरात घुसल्या. या हल्ल्यात मोहोळ जागेवरच खाली कोसळला. त्याच्या शरीरामधून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला होता. गोळीबार करून पोळेकर आणि त्याचे साथीदार पसार झाले. दरम्यान धुमाळ यांनी त्याला सह्याद्री रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मोहोळवर गोळीबार झाल्याची बातमी शहरभरात पसरताच शेकडो तरुणांचा जमाव सह्याद्री रुग्णालयासमोर जमा झाला. घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, संदीपसिंह गील, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भीमराव टेळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर, कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पोलिसांना चार पुंगळ्या आढळून आल्या आहेत. सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी ससूनमध्ये देखील शेकडो तरुणांची गर्दी जमा झाली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!