प्रतिनिधी: संकेश यादव

पुणे,गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाला. या आरोपीने शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाने इन्स्टाग्रामवर खाते उघडले होते.

या खात्यावरुन स्वाती यांना दोन वेळा धमक्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान, आरोपीच्या शोधार्थ गुन्हे शाखा, बंडगार्डन पोलीस, सायबर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ललित पाटील पलायनप्रकरणात पुणे पोलिसांची नाचक्की झाल्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडली आहे.

मार्शल लुईस लिलाकर (२४, रा. आकुर्डी) असे पसार झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, धमकी दिल्याप्रकरणात स्वाती यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मार्शलविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याला अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, रविवारी पहाटे त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तपासणीनंतर बंदोबस्तावरील दोन पोलीस कर्मचारी कागदपत्रांची पूर्तता करण्यास पुढे गेले. त्यांच्या मागे असलेला मार्शल मात्र मागच्या मागे फरार झाला. त्याला पोलिसांनी बेड्या घातल्या नव्हत्या. दोनच मिनिटांत त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. त्यांनी धावतपळत ससून परिसरात शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. याप्रकरणाचा तपास बंडगार्डनचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या.

मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

यापूर्वी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षातून (वाॅर्ड क्रमांक १६) पसार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी १३ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. तसेच ससूनचे डीन संजीव ठाकूर यांचाही पलायनप्रकरणी हात असल्याने पोलिसांनी तपासात उघड केले आहे.

पोलीस आयुक्तांकडून सायबर अधिकारी फैलावर-

मार्शल याला सायबर पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचारी ससूनमध्ये घेऊन गेले. तेथून पोलीस निरीक्षक, दोन कर्मचारी आणि मार्शलला सोडून नाइट राऊंडवर गेले. मार्शलला रुग्णालयात नेताना बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या. दोन कर्मचाऱ्यांनीही कामात निष्काळजीपणा दाखवला. मार्शलपाशी एका कर्मचाऱ्याने थांबून दुसऱ्याने कागदपत्राची पूर्तता करण्यास जाणे आवश्‍यक होते. मात्र, दोघेही कर्मचारी एकत्र गेले. याची गंभीर दखल पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी घेतली आहे. त्यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आता ते काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मैत्रिणीसोबत सापडला होता लॉजवर

स्वाती मोहोळ यांना धमकी दिल्याप्रकरणी काही संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली होती. यावर आयुक्तांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. दरम्यान, संबंधित इन्स्टाग्राम खात्याचा तपास करता, ते मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाचे खाते असल्याचे उघड झाले. मात्र, पोळेकर हा कारागृहात आहे. अधिक तपास करता, हे खाते एका लॉजमधून ऑपरेट झाल्याचे समोर आले. पोलिसांनीजाऊन तपास केला असता, तेथे मार्शल मैत्रिणीसोबत आढळला. त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच हे खाते तोच ऑपरेट करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे शिक्षण बीबीएपर्यंत झाले असून त्याने आठच दिवसांपूर्वीच नोकरी सोडली आहे.

तपास लोणावळ्याच्या दिशेने

ससूनच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे पाहणी केली असता, मार्शल हा पळून जाताना दिसत आहे. पुढे तो पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यावेळी लोणावळ्याला जाणारी एकच लोकल फलाटावर होती. यामुळे लोणावळ्याकडेही एक पथक पाठवण्यात आले. तर, इतर पथके त्याच्या आकुर्डीतील घरी, मैत्रिणीच्या घरी आणि इतर ठिकाणी रवाना झाली आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!